जळगाव येथील लोकअदालतीत निर्णय
जळगाव (प्रतिनिधी) : अनधिकृतपणे मेडीकल पॉलिसीची रक्कम नाकारल्याने स्टार हेल्थ अॅन्ड अलाईड इन्शुरन्स कंपनीला ग्राहक तकार निवारण आयोग जळगावने दणका दिला आहे. विमाधारकास मेडीक्लेम रक्कम देण्याचे आदेश लोकअदालतीत देण्यात आले आहेत.
तक्रारदार कपिल सुरेशकुमार पारपियानी यांनी त्यांचे परिवाराचे स्वास्थसुरक्षा करीता स्टार हेल्थ अॅन्ड अलाईड इन्शुरन्स कंपनी यांचेकडून मेडीक्लेम पॉलिसी विकत घेतली होती. सदर पॉलिसीचे नियमितपणे २०१९ सालापासून तक्रारदार नियमितपणे प्रिमियम भरत होता. तकारदार यांच्या पत्नी राशी कपिल पारपियानी यांना ऑगस्ट २०२३ मध्ये कमरेत किरकोळ दुखापत सुरु झाली होती. सदर दुखापतीच्या औषधोपचाराकरीता तकारदाराने दिर्घकाळ विविध दवाखान्यात सल्ला घेत उपचारासाठी अॅडमिट झाले होते. सदर उपचाराचा आर्थिक खर्च विमा कंपनीकडून घेणेकरीता तकारदाराने प्रतिवादी मेडीक्लेम पुरविणारी स्टार हेल्थ अॅन्ड अलाईड इन्शुरन्स कंपनीकडे दावा सादर केला. सदरचा दावा हा विमा कंपनीने अनधिकृतपणे नामजूर केला
.
त्यात प्रमुख कारण असे दिले की, ‘सदरचा आजार हा विमाधारकाला मागील दिर्घ काळापासून आहे. सदरचा आजार हा विमाधारकाने पॉलिसी काढतेवेळी प्रतिवादी विमा कंपनीपासून लपवून ठेवला. अशा परिस्थितीत “Misrepresentation of Facts” या सदराखाली सदरचा मेडीक्लेम हा नामंजूर केला. सदर विमा कंपनीचे निर्णयाविरुध्द तकारदाराने जळगाव येथील ग्राहक तकार निवारण आयोग यांचे समक्ष तक्रार दावा अर्ज दाखल केला होता. तकारदाराचे वकीलांनी ठाम बाजू मांडत दाव्यासोबत संपुर्ण औषधोपचाराचे दस्तऐवज व वैद्यकीय अहवाल सादर केलेत. प्रथमदर्शनीय सदरचे अहवाल व दस्तऐवज हे तक्रारदारांचे वकीलांनी विमा कंपनीचे निदर्शनास आणून दिल्याने प्रतिवादी स्टार हेल्थ अॅन्ड अलाईड इन्शुरन्स विमा कंपनीने सदरची तकार मान्य केली.
आज दि.२२ मार्च रोजी झालेल्या लोक अदालतीमध्ये तक्रारदार कपिल सुरेशकुमार पारपियानी यांना मेडीक्लेमची रक्कम देण्याचे निश्चित केले. तक्रारदारास भविष्यात मेडीक्लेम पॉलिसी अदा करु याची देखील खात्री दिली. सदर मान्यता पत्र हे ग्राहक तक्रार निवारण आयोग, जळगाव यांचे समक्ष लोकन्यायालयाचे पॅनल अध्यक्ष सी. आर. सप्रे व सदस्य एस. ए. माणिक,प्रतिभा पाटील यांनीदिले. सदर तक्रारीचे निवारण आठ महिन्यांच्या आत झाल्याने तकारदार समाधानी होते. तक्रारदारातर्फे ॲड. दर्शन सुनील चौधरी व ॲड. श्रेयस चौधरी यांनी कामकाज पाहीले. विमा कंपनीतर्फे ॲड. प्रसाद गोडबोले यांनी बाजू मांडली.