मुंबई (वृत्तसंस्था) – मंचर – कुरवंडी (ता. आंबेगाव) येथील मूळ गाव असलेले आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील भाजीपाल्याचा व्यापार करणाऱ्या पिता, पूत्र आणि नातवाचा अवघ्या 15 दिवसांत मृत्यू झाल्याने कुरवंडी गावावर शोककळा पसरली आहे.

नवी मुंबई येथील बाजार समितीत भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे विठ्ठल गणाजी बारवे (वय 83) हे त्यांच्या मुलगा आणि नातवाबरोबर नेरुळ येथे राहत होते. विठ्ठल बारवे हे कुरंवडी येथून तीन महिन्यांपूर्वी मुलाकडे नेरुळ येथे राहण्यासाठी गेले. मंगळवारी (दि. 12) त्यांची प्रकृती बिघडल्याने विठ्ठल बारवे यांना कुरवंडी येथे मूळगावी आणले. त्यानंतर त्यांची प्राणज्योत अवघ्या दोन तासात मालवली.
या दुदैवी घटनेनंतर त्यांचा मुलगा राजेंद्र आणि नातू रोशन यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शनिवारी (दि. 23) रोशन राजेंद्र बारवे (वय 25) यांचा तर त्यांचे वडील राजेंद्र बारवे (वय 48) यांचे शुक्रवारी (दि. 29) मुंबई येथे आकस्मित निघन झाले. अवघ्या 15 दिवसांत तीनकर्त्यां पुरुषांचा दुर्देवी अंत झाल्यामुळे कुरवंडी गावासह नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.







