पारोळा तालुक्यातील खेडी ढोक येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील खेडी ढोक येथे ३८ वर्षीय शेतकऱ्यास विषारी सर्पाने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दि.१२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत प्रविण यशवंत पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. दि.१२ रोजी सकाळी ८ वाजेचे सुमारास लहान भाऊ रविंद्र यशवंत पाटील हा शौचासाठी गावाबाहेर गेला होता. रविंद्र पाटील याने मोठ्या भावाला घरी येवुन सांगितले की, मी शौचास गेलो होतो तेव्हा मला पायाला काहितरी चावले असुन आता पायाला त्रास होत आहे. नंतर प्रविण पाटील व चांगदेव धनर्सिंग पाटील असे रविंद्र यास मोटार सायकल बसवुन कुटिर रुग्णालय, पारोळा येथे उपचारास दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरु असतांना संध्याकाळी ६ वाजेचे सुमारास तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास साळुंखे हे करीत आहेत. तरुण शेतकऱ्याच्या अकाली मृत्यूने पारोळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.