जळगाव एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथील जैन व्हॅली एनर्जी पार्क येथून पी. व्ही. सोलर केबल चोरी करणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
जैन व्हॅली एनर्जी पार्क येथून दि. २७ जानेवारी रोजी २५० मीटर पी. व्ही. सोलर केबल चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत कंपनीचे अविनाश बढे
यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फैजल रज्जाक पिंजारी (रा. शिरसोली) याने व त्याच्या सोबत असलेल्यांनी चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून फैजल रज्जाक पिंजारी (वय २५) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संबंधित संशयित आरोपीला न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.