जळगाव – गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट सपोर्ट आणि प्रोग्रेशन सेलच्या वतीने ‘जर्मनीतील प्लेसमेंट’ या विषयावर व्यापक करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या मार्गदर्शन सत्रासाठी ‘Go Global’ या संस्थेच्या माध्यमातून प्रमुख अतिथी डॉ. ललित पाटील (एमडी फिजिशियन, डीसीएच, पुणे) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी जर्मनीमधील नर्सिंग क्षेत्रातील संधी, पात्रता अटी, प्रवेश प्रक्रिया, भाषा प्राविण्याची गरज आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, व्हिसा प्रक्रियेची माहिती आणि नर्सिंग व्यवसायाच्या जागतिक संधी यावरही सखोल चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या शंका समाधानासाठी विशेष संवाद सत्र देखील आयोजित करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने अशा प्रकारच्या उपयुक्त मार्गदर्शन सत्रांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल, असे प्राचार्यांनी सांगितले.