जळगाव खुर्द गावाजवळ येथील घटना,
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला सर्व्हीस रोडच्या कामाच्या ठिकाणी रात्री झोपलेल्या उत्तर प्रदेश येथील तीन परप्रांतीयांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. ११ मार्च रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
जळगाव शहरापासून जळगाव खुर्द हे गाव अगदी ८ किलोमीटर अंतरावर आहे. येथील राष्ट्रीय महामार्ग गेला असून आता नव्याने चौपदरीकरणाचे काम सुरू असून या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे काम देखील सुरू आहे. याच पुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडचे देखील काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतूकीसाठी बंद होता. याच रोडच्या आणि पुलाच्या कामाच्या ठिकाणी परप्रांतीय मजूर कामाला आहेत. दरम्यान, मंगळवारी दि. ११ मार्च रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास सिकंदर नाटूसिंग राजपूत, भुपींदर मिथीलाल राजपूत आणि योगेश कुमार राजबहाद्दूर (तिघे रा. उत्तर प्रदेश) हे सर्व्हिस रोडवर बांधकामाचे साहित्य व पट्टी टाकून झोपलेले होते. तिघेजण गाढ झोपेत असतांना अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले. ही घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली.
त्यानुसार नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान हा सर्व्हिस रोड वाहतूकीसाठी बंद होता. याठिकाणी रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारीचे काम देखील सुरू होते.