पारोळा तालुक्यातील सुमटाणे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील सुमटाणे येथे मजुरीसाठी काही कुटुंब आले आहेत. यातील एका कुटुंबातील दीड वर्षीय बालिका तिच्या मोठ्या बहिणीसह ट्रॅक्टरवर खेळत असताना अचानक खाली पडली. तिला ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे नेले असता तेथे काही तासांनी उपचारदरम्यान ती मयत झाली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिवानी धरमसिंग मेहता (वय दीड वर्ष) असे मयत बालिकेचे नाव आहे. तिचे वडील धरमसिंग मेहता हे लवाणी ता. सेंधवा जि. बडवानी, मध्य प्रदेश येथील रहिवासी असून सध्या पारोळा तालुक्यातील सुमटाणे येथील अविनाश मधुकर पाटील यांचे गुराढोरांचे शेडवर राहण्यासाठी आहेत.(केसीएन)धरमसिंग मेहता हे पत्नी, मोठी मुलगी नंदिनी, वय ४ वर्ष आणि लहान मुलगी शिवानी वय दीड वर्ष यांच्यासह राहतात. अविनाश पाटील यांचे शेतामध्ये मजुरी काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान बुधवारी दि. ५ मार्च रोजी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास धरमसिंग मेहता हे आणि त्यांची पत्नी घरी असताना त्यांचे मोठी मुलगी नंदिनी आणि लहान मुलगी शिवानी हे त्यांच्या मालकाच्या ट्रॅक्टरवर खेळत होते.
अचानक त्यांना शिवानीच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी धावत जाऊन पाहिले असता शिवानी हिच्या तोंडातून व डोक्यातून रक्त निघत होते. मोठी मुलगी नंदिनी हिने, ती ट्रॅक्टरवरून खाली पडली असे सांगितले.(केसीएन)त्यानंतर तातडीने धरमसिंग मेहता यांनी मालक अविनाश पाटील यांच्यासोबत ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवानी हिला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटनेप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार सुनील हटकर करीत आहेत.