अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : एका विद्यार्थ्याला शेतात जाताना दोन मोबाइलसह पैसे व कपडे असलेली पिशवी सापडली. सदरची थैली हि पोलीस पाटील शीतल पाटील यांची असल्याचे दिसून आले. मंगरूळ येथील अनिल अंबर पाटील या माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे वस्तू मालकाला परत केले आहे. मोबाइलमध्ये अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असल्याने मालकाने विद्यार्थ्यांचा मोठा सत्कार केला.
मंगरूळ येथील अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत विशाल पाटील हा ७ रोजी भावासह शिरूड रस्त्यावर शेतात जात असताना त्याला रस्त्यात कपडे असलेली पिशवी मिळाली. त्यात पैसे असलेली पर्स आणि दोन मोबाइल होते. वेदांतने सर्व वस्तू वडील विशाल पाटील यांना विचारून घरी आणल्या. दोघांनी वर्गशिक्षक संजय पाटील यांना घटना सांगितली. त्यादरम्यान मोबाइलवर आलेल्या कॉलवरून मूळ मालकाचा शोध लागला. त्या वस्तू पारोळा तालुक्यातील इंधवे येथील पोलिस पाटील शीतल ज्ञानेश्वर पाटील यांच्या असल्याची माहिती मिळाली. त्या मोबाइलमध्ये त्यांच्या पतीची आर्मीची महत्त्वाची कागदपत्रे तसेच मुलीच्या नीट परीक्षेचा सर्व अभ्यासक्रम असल्याने ते कुटुंब व्यथित झाले होते.
शीतल पाटील यांना भागवत पाटील यांनी वस्तू घेण्यासाठी मंगरूळ येथील अनिल अंबर पाटील शाळेत बोलावले. सर्वांसमक्ष वस्तू परत करण्यात आल्या. मोबाइलमधील कागदपत्रे आणि सर्व अभ्यासक्रम जसाच्या तसा परत मिळाल्याने शीतल पाटील यांनी वेदांतचा सत्कार करून त्याला बक्षीस दिले.यावेळी शीतल पाटील, पोलिस पाटील भागवत पाटील, जिराळी पोलिस पाटील भाऊसाहेब पाटील, विशाल पाटील, वर्गशिक्षक संजय पाटील, हेमंत पाटील, महेश पाटील, योगेश पाटील, संदीप पाटील, विनोद पाटील, चंद्रकांत पाटील, लक्ष्मण पाटील, सौरभ पाटील, विलास पाटील, रवींद्र वडार हजर होते.