अमळनेर तालुक्यातील दोंडाईचा बस मधील घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) – जळगाव ते दोंडाईचा बसमधून अज्ञात चोरट्यानी साडे तीन लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना ६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील पैलाड भागात घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला.
प्रतिभा जिजाबराव पाटील (वय ४८ रा.गारखेडा ता. धरणगाव) ही महिला ६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील वाघोदा येथे नातेवाईकांच्या लग्नाला जाण्यासाठी जळगाव दोंडाईचा बस मध्ये बसली. बसमध्ये गर्दी असल्याने दोन महिलांनी तिला त्यांच्या बाजूला बसण्यास जागा दिली. अडीच वाजेच्या सुमारास बस अमळनेर शहरात आली असता पैलाड भागात शेजारी बसलेल्या दोन्ही महिला उतरून गेल्या. महिलेने आपली पर्स तपासून पाहिली असता पर्सची चेन उघडी दिसली. त्यात ठेवलेले १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ४० ग्राम सोन्याच्या बांगड्या, तसेच २ लाख रुपये किमतीची ५० ग्राम मंगळसूत्र असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याचे समजले.
दरम्यान, यामुळे महिला आजारी पडली. तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार घेऊन परत आल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.