झाडावरून पडल्याने तरुण जखमी
जळगाव (प्रतिनिधी) : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे गुरुवारी दुपारी गेस्ट हाऊसच्या मागील बाजूस वणवा पेट घेतल्याने धावपळ उडाली होती. या घटनेत एका तरुणाचा झाडावरून पडल्याने तो जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लखन मुरलीधर लोणकर (वय ३७, रा. एकलंग्न ता. धरणगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दि. ६ मार्च रोजी दुपारी अचानक झाडांना व वाळलेल्या गवतांना आग लागली. एका कडुनिंबाच्या झाडावर लखन लोणकर हा फांद्या तोडायला चढलेला होता. अचानक झाडाच्या शेंड्यावर आग लागल्याने तो खाली उतरू लागला. त्याचवेळेला फांदी तुटली व तो खाली पडला. यात त्याच्या दोन्ही हाताला जखमा झाल्या असून मुकामार लागला आहे.
तर आग विझविण्यासाठी विद्यापीठासह, जैन इरिगेशन, जळगाव महानगरपालिका आणि धरणगाव पालिकेकडील अग्निशामक बंब मागविण्यात आले होते. त्याद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली. घटनेमध्ये आणखी कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र घटनेमुळं अचानक धावपळ उडाली होती.