सरकारी कार्यालयांसह दिवाबत्ती, पाणीपुरवठा विभाग बिलबुडवे
जळगाव (प्रतिनिधी) :- मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या जळगाव परिमंडलात वीजबिल वसुली कामास प्राधान्य देण्यात आले आहे. चालू महिन्याच्या बिलासह थकबाकीत असणाऱ्या ग्राहकांकडील थकबाकीची संपूर्ण क्षमतेने वसुली करण्याच्या सक्त सुचना मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांनी दिल्या आहेत. फेब्रुवारी २०२५ अखेरच्या तपशीलानुसार परिमंडलात कृषी वगळता लघुदाब श्रेणीतील इतर सर्व वर्गवारितील ३. ८७ लाख ग्राहकांकडे सुमारे ९७४ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
मुख्य अभियंता मुलाणी यांनी बुधवारी दि. ५ मार्च रोजी परिमंडलातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन्ही जिल्ह्यातील वित्त व लेखा विभागाचे सहायक व उपलेखापाल, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक यांच्यासह अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते आणि सहायक अभियंत्याची व्हिडीओ कॉन्फ्रन्सींगव्दारे बैठक घेतली. बैठकीत जिल्ह्यानिहाय थकबाकी वसुलीचे उद्दिष्ठ देऊन आवश्यकतेनुसार सार्वजनिक पाणीपुरवठा व सार्वजनिक दिवाबत्तीचा थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्याच्याही सक्त सुचना दिल्या.
जळगाव परिमंडलात विविध खात्यांची सरकारी कार्यालये आहेत. धुळे जिल्ह्यात १३०६ सरकारी कार्यालयाकडे १ कोटी ८७ लाख रुपये, जळगाव जिल्ह्यात २५२७ कार्यांलयांकडे ३ कोटी ७९ लाख रुपये तर नंदुरबार जिल्ह्यात १०६६ कार्यालयांकडे १ कोटी ९२ लाख रुपयांची थकबाकी आहे. धुळे जिल्ह्यात सार्वजनिक दिवाबत्तीच्या १२६१ जोडण्या थकबाकीत असून त्यांच्याकडे १३३ कोटी ५० लाख, जळगाव जिल्ह्यात 2833 जोडण्यांवर १७४ कोटी ५६ लाख तर नंदुरबार जिल्ह्यात १३३८ वीज जोडण्यांवर दिवाबत्तीची १५० कोटी ८९ लाख रुपयांची विजेची थकबाकी आहे.
सार्वजनिक पाणीपुरवठ्यांच्या जोडण्यांवरही मोठी थकबाकी आहे. धुळे जिल्ह्यात ११३९ जोडण्यांवर १२३ कोटी ८० लाख, जळगाव जिल्ह्यात २३३१ जोडण्यांची २६३ कोटी ३५ लाख तर नंदुरबार जिल्ह्यांत ८०२ जोडण्यांवर ५४ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी आहे. धुळे जिल्ह्यात ९४ हजार घरगुती वर्गवारीत ग्राहकांकडे १६ कोटी ४५ लाख, जळगाव जिल्ह्यात २ लाख ७५६७ ग्राहकांकडे २८ कोटी ३८ लाख, तर नंदुरबार जिल्ह्यात ४३ हजार ३४८ थकबाकीदार घरगुती ग्राहकांकडे ५ कोटी २२ लाख रुपये थकीत आहेत.
धुळे जिल्ह्यात ६३०० वाणिज्यक ग्राहकांकडे ३ कोटी ९० लाख, जळगाव जिल्ह्यात १३ हजार ६०५ ग्राहकांकडे ४ कोटॊ ९३ लाख तर नंदुरबार जिल्ह्यात ३ हजार ८० ग्राहकांकडे १ कोटी ९ लाख रुपयांची वाणिज्यक वापरांची वीजबिले थकीत आहेत. औद्योगीक वर्गवारीतील १५०४ ग्राहकांकडे धुळे जिल्ह्यात २ कोटी ३९ लाख, जळगाव जिल्ह्यात २४३४ ग्राहकांकडे ४ कोटी ४ लाख तर नंदुरबार जिल्ह्यात ४८२ औद्योगीक वीजवापराची ५४ लाख रुपयांची थकबाकी आहे.
इतर वर्गवारीतील २१७ ग्राहक धुळे जिल्ह्यात थकबाकीत असून त्यांच्याकडे १२ लाख थकले आहेत. जळगाव जिल्ह्यात १२६ ग्राहकांकडे १२ लाख तर नंदुरबार जिल्ह्यात ५३ ग्राहकांकडे ४ लाख रुपयांची थकबाकी आहे. उपरोक्त सर्व थकबाकीदार ग्राहक हे चालू स्थितीत असून काही ग्राहकांचा थकबाकी पोटी तातपुरत्या स्वरुपात वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. परिमंडलातील ग्राहकांनी चालू महिन्याच्या देयकांसह सर्व थकित बिलांचा भरणा करुन वीज पुरवठा खंडित होण्याची अप्रिय कार्यवाही टाळावी असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.