पारोळा तालुक्यातील घटनेप्रकरणी अमळनेर न्यायालयाचा निकाल
अमळनेर (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला लग्नास नकार दिल्याने आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पारोळा तालुक्यातील टोळी येथील नराधमास अमळनेरच्या तदर्थ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांनी १० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पारोळा तालुक्यातील टोळी येथील शिवनंदन शालीक पवार उर्फ दादू (वय ३६) याने २०२० मध्ये ओळखीच्या एका तरुणीला स्वतः विवाहित असताना लग्नाचे आमिष दाखवले आणि कधी मोटरसायकलवर तर कधी मारोती वाहनात नेऊन तिच्याशी जबरी लैंगिक संबंध प्रस्थापित करत राहिला. (केसीएन)आरोपीने त्या तरुणीला कासोदा येथील एका घरात नेऊन रात्रभर लैंगिक अत्याचार केला आणि दुसऱ्या दिवशी ८ नोव्हेंबर रोजी तरुणीने लग्न करण्यास सांगितल्यानन्तर शिवनंदन याने नकार देऊन तिला सोडले आणि तू आत्महत्या करून घे मी पण करून घेतो म्हणत अश्लील शब्दांचा वापर केल्याने व्यथित होऊन तरुणीने दि. ८ नोव्हेंबर २०२० रोजी आत्महत्या केली होती. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला शिवनंदन विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, बलात्कार करणे आणि ऍट्रोसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीला दि. १९ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. हा खटला अमळनेर येथील सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील ऍड. राजेंद्र चौधरी यांनी युक्तिवाद करून एकूण २६ साक्षीदार तपासले होते.(केसीएन)यात मुलीने मृत्यूपूर्वी आपली आई आणि बहीण याना घटना कथन केली होती. त्यांचे तसेच पोलिसांचे व वैद्यकीय अधिकारी आर के गढरी यांनी दिलेली साक्ष ग्राह्य धरून आरोपी शिवनन्दन यास न्या. सी. व्ही. पाटील यांनी भादवि कलम ३७६ प्रमाणे १० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली. इतर कलमात आरोपीला निर्दोष मुक्त केले. अटकेपासून आरोपी कारागृहात होता. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे , हेडकॉन्स्टेबल पु. शा. वाल्डे, प्रमोद पाटील, भरत ईशी, राहुल रणधीर यांनी काम पाहिले.