महावितरणच्या जळगाव परिमंडलतर्फे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : संपूर्ण देशभरात दि. ४ मार्च हा दिवस ‘लाईनमन डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने महावितरणच्या जळगाव परिमंडलातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही दि. ४ मार्च रोजी विविध कार्मक्रमांनी ‘लाईनमन डे’ साजरा करण्यात येणार आहे. गुणवंत लाईनमनचा गौरवही करण्यात येणार आहे.
जनमित्र म्हणजे लाईनमन. लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी तो चोवीस तास कार्यरत असतो. ऊन, वारा व पावसात किंवा इतर खडतर परिस्थितीतही तो काम करीत असतो. देशभरातील लाईनमन बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच त्याच्या कामाला प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘लाईनमन दिवस’ साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाने लाईनमन दिवसाच्या आयोजनाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे महावितरणच्या जळगाव परिमंडलातही क्षेत्रिय स्तरावर ‘लाईनमन दिवस’ साजरा करण्याचे निर्देश मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांनी दिले आहेत.
लाईनमन दिनी गुणवंत लाईनमनचा गौरवही करण्यार येणार आहे. कार्यक्रमात वीज सुरक्षेची शपथ, वीज सुरक्षेबाबत प्रबोधन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित कार्यक्रमास महावितरणचे सर्व महिला व पुरुष लाईनमन यांच्या समवेत बाह्यस्त्रोत लाईनमनही उपस्थित राहतील. 4 मार्च रोजी होणारा ‘लाईनमन डे’ परिमंडल, मंडल, विभाग आणि आवश्यकतेनुसार दुर्गम भागात उपविभागीय स्तरावरही आयोजित करण्याच्या सुचना मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी यांनी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महावितरणच्या क्षेत्रिय कार्यालयांना दिल्या आहेत.