रेल्वे प्रशासनाची माहिती
भुसावळ (प्रतिनिधी) : विभागातील रावेर रेल्वे स्थानक भुसावळ विभागातील दुसरे हरित स्थानक ठरले आहे. रावेर रेल्वे स्थानकाचे विद्युतीकरण वर्ष १९६४ मध्ये झाले. सध्या येथे ९९ केडब्ल्यू एवढे कनेक्टेड लोड असून, वार्षिक ८७ हजार ५४ युनिट वीजेचा वापर केला जातो. आतापर्यंत संपूर्ण वीज मागणी राज्य विद्युत मंडळाकडून खरेदी करून पूर्ण केली जात होती.
दि. २५ रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी व्हर्च्युअली रावेर रेल्वे स्थानकावरील ८२ केडब्ल्यूपी क्षमतेच्या सौरऊर्जा छतावरील विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन केले, यामुळे हे स्थानक विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर झाले आहे. रावेर रेल्वे स्थानकावर स्थापित ८२ केडब्ल्यूपी क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प दरवर्षी १,१९,७२० युनिट सौरऊर्जा निर्माण करेल. हा प्रकल्प केवळ स्थानकाच्या दैनंदिन वीजेच्या गरजा पूर्ण करणार नाही, तर वार्षिक वापरापेक्षा ३२ हजार ६६६ युनिट अधिक ऊर्जा निर्माण करेल. यामुळे रावेर हे देवळालीनंतर भुसावळ विभागातील दुसरे हरित स्थानक ठरले आहे.
या सौरऊर्जा प्रकल्पामुळे रावेर रेल्वे स्थानक संपूर्णपणे नूतनीकरणयोग्य ऊर्जा, म्हणजेच सौरऊर्जेवर कार्यरत राहील. या प्रकल्पातील अतिरिक्त सौरऊर्जा नेट मीटरिंग तंत्राद्वारे वीज वितरण कंपनीला पुरवली जाईल. नेट मीटरिंगमुळे भुसावळ विभागाला दरवर्षी सुमारे ₹९९ हजार ६३१ चा आर्थिक लाभ मिळेल. हा सौरऊर्जा प्रकल्प फॉसिल इंधनावर आधारित वीजेवरील अवलंबन कमी करण्यास मदत करेल तसेच दरवर्षी ९१ मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करेल. रेल्वेच्या या प्रयत्नातून शाश्वत विकासाच्या दिशेने कमीत कमी कार्बन फूटप्रिंट ठेवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा प्रत्यय येतो.