भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : शेतात कोरडा झालेला हरभरा जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील तळवेल शिवारातील शेतात सोमवार २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ३ वाजता घडली. आगीत ५५ हजार रुपये किमतीचे नुकसान झाल्याची वरणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
राजेंद्र निवृत्ती सरोदे (वय-४६, रा. तळवेल ता. भुसावळ) यांचे तळवेल शिवारातील शेत गट क्रमांक ४३५ मध्ये शेत असून या शेतात त्यांनी कापून ठेवलेला कोरडा हरभरा जमा करून ठेवला होता. आगीत शेतकऱ्याचे ५५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात राजेंद्र निवृत्ती सरोदे यांनी दुपारी १ वाजता वरणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.