भडगाव तालुक्यात कजगावातील घटना सीसीटीव्हीत कैद
भडगाव (प्रतिनिधी) : महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधीच भडगाव तालुक्यातील कजगाव येथील पुरातन महादेव मंदिरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महादेवाच्या पिंडीवरील सोन्याचे कवच, त्रिशूल आणि पितळी नाग चोरट्याने लंपास केले आहे. भडगाव पोलीस चोरट्याला शोधत आहे.
कजगावच्या वाडे रस्त्यावरील मनमाड कंपनी भागात पुरातन मनकामेश्र्वर महादेव मंदिर आहे. २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून महादेवाच्या पिंडीवरील सोन्याचे कवच, त्रिशूल आणि पितळी नाग लंपास केले. या चोरीत मंदिरातील तांबे-पितळाच्या एकूण ७० ते ८० हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीस गेल्या आहेत.महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. मात्र, सकाळी भाविक दर्शनासाठी आले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झाला असून भडगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत.