जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागातील हुडको परिसरात एका १४ वर्षाच्या मुलीला पाण्याच्या मोटारीमुळे विजेचा धक्का लागून ती मयत झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोनल सुरेश बाविस्कर (वय १४, रा. शिवाजीनगर हुडको, जळगाव) असे मयत बालिकेचे नाव आहे. ती वडील, आजी, आजोबा आणि लहान भाऊ व बहीण यांच्यासह राहत होती.(केसीएन)गुरुवारी संध्याकाळी नळाला पाणी आले होते. पाण्यासाठी मोटर लावलेली असताना सोनल बाविस्कर हिचा हात मोटरला लागला आणि त्यातून विद्युत प्रवाह वाहत असल्यामुळे विजेचा धक्का लागल्याने ही जागीच फेकली गेली. आजूबाजूच्या नागरिकांनी ही घटना पाहताच तिला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान शासकीय रुग्णालयामध्ये शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी व नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.(केसीएन)चिमुकलीच्या अचानक मृत्यूमुळे छत्रपती शिवाजीनगर भागात शोक व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी रुग्णालयात येऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.