पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : – तालुक्यातील वरखेडी येथील एका २७ वर्षीय विवाहितेने एका खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १३ फेब्रुवारी गुरुवार रोजी उघडकीस आली असून संबंधित महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये स्वताच्या आवाजात एक संदेश ध्वनी मुद्रित करुन संबंधित इसमाच्या नावाचा उल्लेख करुन आत्महत्या केली असल्याची बाब उघडकीस आली आहे. महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. घटनेप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वरखेडी येथील सर्वसाधारण कुटुंबातील आरती समाधान पाटील या चाळीसगाव येथील सॅटीन क्रिडेट केअर नेटवर्क लिमिटेड कंपनीत असिस्टंट ब्रँच मॅनेजर या पदावर काम करत होत्या. या कंपनीत काम करत असतांनाच या कार्यालयातील प्रिन्स कुमार, कपिल वाडपत्रे व आकाश कुन्हेकर हे त्रिकूट कार्यालयात आरती काम करत असतांना तिला संबोधून वाइट हेतूने बोलत होते.
मयत आरतीकडे ते शरीर सुखाची मागणी करीत होते. मात्र त्याला नकार दिल्यामुळे तिघांनी तिला कामावरून काढून टाकले होते. आरतीने दि. २७ जानेवारी रोजी चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे घडलेल्या प्रकार कथन करुन तसा तक्रारी अर्ज दाखल केला होता. ही बाब आकाश कुन्हेकर याला माहीत झाल्यावर त्याने आरती सोबत केलेल्या गैरकृत्याचे मित्राच्या मदतीने काढलेले काही फोटो व चित्रफिती आरतीच्या मोबाईलला पाठवून तु जर माझ्याविरुद्ध तक्रार दाखल केली तर मी हे फोटो सोशल मिडियावर टाकून तुला बदनाम करुन सोडेल व तुला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही व तुझ्या सासरचे ही तुला हाकलून देतील अशी धमकी दिली होती. आकाश कुन्हेकर याच्या धमकीला घाबरुन आरतीने उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव यांच्याकडे दिलेला अर्ज मागे घेतला होता अशी माहिती समोर येत आहे.
कंपनीतील तिघाही संशयित आरोपींच्या या छळाला कंटाळून आरतीने टोकाचा निर्णय घेतला. दि.१२ फेब्रुवारी रोजी घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून जात पी. जे. रेल्वे लाईन जवळ असलेल्या स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ गुरुवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
ही बाब घटना उघडकीस येताच वरखेडीचे पोलीस पाटील बाळू कुमावत यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला खबर दिली. पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी घटनास्थळी येऊन मयत आरतीचा मृतदेह विहिरीतून काढून उत्तरिय तपासणीसाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे व त्यांचे सहकारी करत आहेत.