अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोंढवे येथे पाणी आले म्हणून तरुण जोडपे पाणी भरत होते. त्यावेळी पाण्यासाठी मोटार लावताना यातील विवाहितेला जबर विजेचा धक्का लागून त्या जागीच गतप्राण झाल्या. त्यांचे पती घरात पाणी भरत होते. या घटनेमुळे लोंढवे गावात शोककळा पसरली असून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पूनम विनोद पाटील (वय २७, रा. लोंढवे ता. अमळनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्यांचे पती विनोद शेती करून संसार सुखाने करीत होते. मंगळवारी पूनम ह्या सायंकाळी नळाला पाणी आले म्हणून मोटर लावून पाणी भरत होत्या. तिचे पती विनोद सुरेश पाटील घरात माठात पाणी भरत होते. अचानक काही तरी पडल्याचा आवाज आला म्हणून पती विनोद पाटील पळत आले तेव्हा त्यांना त्यांची पत्नी पूनम खाली बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. तिच्या हातात विजेची पिन होती. तिला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. लग्नाच्या आठ वर्षांनी दोघांचा डाव अर्ध्यावरती मोडला. प्रेम सप्ताहातील “वचन दिवशी” प्रेमी युगुलाच्या वचनाचा भंग झाला. नियतीने पुनमला विनोद पासून हिरावून नेले, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटल्या. विनोद पाटील यांच्या खबरीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.