सरपंच, ग्रामस्थांच्यावतीने जाहीर सत्कार
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खिर्डी येथील अंकुश किशोर तायडे याची धुळे येथे महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलात त्याची निवड झाली आहे. त्या अनुषंगाने खिर्डी बुद्रुक येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, येथील सामाजिक संस्था तत्पर फाउंडेशन तसेच गावकऱ्यांनी त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते खिर्डी येथील अ. भा. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षीका ठमाबाई धुंदले यांचे नातु व शिक्षक प्रविण धुंदले याचे भाचे आहेत.
खिर्डी बुद्रुक येथील तरुण देशाच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. त्यांच्या मनात देशसेवेचा दीप प्रज्वलित झाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील तरुण सुद्धा आपल्या मेहनतीने तसेच जिद्दीने यशाच्या मार्गावर जात आहेत. खिर्डी गावातील अंकुश किशोर तायडे याचे पालक आई प्रतिभा आणि वडील किशोर तायडे शेतमजुरी करतात. त्यांनी संघर्षातून दिवस काढत आपल्या तीन मुली व एक मुलाला शिक्षण दिले.
आभोडा ता. रावेर येथील रहीवाशी व खिर्डी येथे वास्तव्यास असलेल्या या कुटुंबातील मुलगा अंकुश किशोर तायडे याने जिद्द, चिकाटीने आणि परिश्रमातुन पोलीस होण्याचे स्वप्न साकार केले. खिर्डी बुद्रुक येथील बुद्धविहारात प्रत्येक समाजाचे तरुण अभ्यास करतात. तसेच काही महिन्यांपूर्वीच याच बुद्धविहारात अभ्यास करून मलक समीर हा तरुण महाराष्ट्र पोलीस झाला. त्यानंतर अंकुश किशोर तायडे याला यश मिळालं.