जळगाव शहरातील धक्कादायक घटना : निलंबनासह अटकेची कारवाई, ७ जणांवर गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) :- सोन्यामध्ये गुंतवणूक करून त्यातून अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिला पोलिस कर्मचारी अर्चना प्रभाकर पाटील हिने २ सहकारी महिला कर्मचाऱ्यांची ३० लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी अर्चना पाटील हिच्यासह ७ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महिला सहाय्य कक्षामध्ये पोलिस शिपाई असलेल्या मंगला सुभाष तायडे (३८, रा. पोलिस लाईन) यांनी फिर्याद दिली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असताना तेथे संशयित अर्चना पाटील हिच्याशी मैत्री झाली. अर्चना हिने सन २०२२ मध्ये नफा मिळवून देणारी सोन्यातील गुंतवणुकीची चांगली योजना असून तुला देखील जास्त नफा मिळवून देईल, असे सांगितले.
मंगला तायडे यांच्यापाठोपाठ जिल्हा विशेष शाखेतील पोलिस शिपाई वैशाली उत्तम गायकवाड (२९) यांनाही अर्चनाने असेच आमिष दाखवत त्यांची १० लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. ७ जणांविरूद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी सुरुवातीला ७० हजार रुपये दिले. महिनाभरात त्यांना ७५ हजार रुपये परत मिळाले. त्यानंतर फिर्यादी रक्कम वाढवून देत असताना वाढीव मोबदला अर्चना देत गेली. त्यामुळे तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर फिर्यादीने अर्चना यांना २० लाख रुपये दिले.
मंगला तायडे यांनी मे २०२४ मध्ये अर्चनाकडे पैसे परत मागितले असता निवडणूक असल्याने पैसे मिळण्यास उशीर लागेल, असे सांगितले. सप्टेंबर २०२४ मध्ये मंगला यांच्यासह गुंतवणूक केलेल्या इतर सात ते आठ महिला व पुरुषांची अर्चनाच्या घरी बैठक घेण्यात आली. पैसे मुंबई येथे अडकल्याचे त्यांना सांगण्यात आले. पैशासाठी सर्वांचाच तगादा वाढत असल्याने टोलवाटोलवी करण्यासाठी ‘सायलेंट ग्रुप’ तयार केला. त्यात सर्वांचे पैसे मिळतील, टेन्शन घेऊ नका, अफवा पसरवू नका, असे मेसेज अर्चना टाकू लागली. नंतर तगादा वाढल्याने ती ग्रुपमधूनही बाहेर पडली.
अर्चना पाटील हिच्याबद्दल तक्रार अर्ज देण्यात आल्यानंतर त्याची चौकशी होऊन तिला निलंबित करण्यात आले व निलंबन काळात मुख्यालयात जमा केले. पैस परत मिळत नसल्याने या प्रकरणी अखेर मंगला तायडे यांनी ७ फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अर्चना पाटील, तिची आई कल्पना पाटील, बहिण मोनिका पाटील, बहिणीचा मुलगा विजय पाटील, मित्र मिरखा नुरखा तडवी, मानसी रवींद्र पाटील, मनीषा चव्हाण या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अर्चना पाटील हिला अटक केली आहे.