विशेष लेखांकन : अभिजीत राऊत यांची छत्रपती संभाजीनगरला बदली
केसरीराज टीम (विशेष लेख) : बदली शासकीय अधिकाऱ्यांच्या आयुष्यातील आकस्मिक मात्र अविभाज्य घटना. मात्र काही अधिकाऱ्यांच्या बदलीने समाजमन हळवे होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली झाली. गुरुवारी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकिय, सामाजिक, प्रशासकीय व पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांची थबकलेली पाऊले बघायला मिळाली.अडीच वर्षांपासून अधिक न बोलता प्रत्यक्ष काम करणारे एक व्यक्तिमत्त्व नव्या ठिकाणी कार्यसिद्धीसाठी निघाले आहेत. नांदेडकरांनी या कार्यकर्तृत्वाला आदराने सलाम केला.
दिवसभरात विविध क्षेत्रातील नागरिकांनी एका गुणवान, मितभाषी, कार्यतत्पर अधिकाऱ्याला निरोप दिला. काही पत्रकारांनी यावेळेत सिंहावलोकन केले. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. गेल्या अडिच वर्षातील एक – एक कामांची यादीच पुढे आली. सुरुवात झाली ती सप्टेंबर २०२२ रोजीच्या रुजू होण्यापासून. जिल्हाधिकारीही हळवे झाले. बदली अनिवार्य ,अपरिहार्य असते पण नांदेड सारखा जिल्हा कायम मनात राहणार आहे. एक गोड आठवणही त्यांनी सांगितली. माझ्या चिमुकलीचा जन्म नांदेडचा आहे, असे ते गौरवाने म्हणाले. गुरूगोविंद सिंघजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेडमध्ये डिसेंबर २०२२ मध्ये घेतलेला वीर बाल दिवस कार्यक्रम, जून २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेला शासन आपल्या दारी कार्यक्रम, फेब्रुवारी २०२४ मध्ये आयोजित केलेला महासंस्कृती व महानाट्य महोत्सव, ऑक्टोबर २०२४ मध्ये आयोजित केलेला मुख्यमंत्री लाडकी बहिण महिला मेळावा.त्यांच्या नेतृत्वातील हे मोठे कार्यक्रम ठरले. डोक्यावर बर्फ, पायात भिंगरी आणि जिभेवर खडीसाखर हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य.या सर्व कार्यक्रमात दिसून आले.
एकाच व्यक्तीला एकाच वर्षात ३ निवडणुका कोणत्याही वादाशिवाय संपन्न करता आल्या. मार्च २०२४ मधली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक त्यानंतर नोव्हेंबरमध्ये लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अतिशय उत्तमपणे त्यांनी हाताळली.दोन्ही निवडणुकांमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत होते.विशेष म्हणजे गेल्या अडीच वर्षात संपूर्ण मराठवाडा परिसरात सामाजिक अंदोलने सुरू होती. मात्र नांदेड मध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नाही. जिल्हादंडाधिकारी म्हणून त्यांनी जिल्ह्यात शांतता राखण्यात यश मिळवले आहे. शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये त्यांना विशेष आवड होती. त्यामुळेच त्यांनी उत्पन्न वाढीसाठी उच्च मूल्य शेती अभियान सुरू केले. केळी निर्यात संदर्भात कार्यशाळा आयोजित केली. रेशीम, फुलशेती याबाबतही त्यांनी लक्ष घातले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानात जवळपास ८१२ कोटींची मदत त्यांच्या कार्यकाळात झाली. सेंद्रीयशेती संदर्भातही काम उल्लेखनीय ठरले.
संकट कोणतेही येऊ दे रात्री-बेरात्री शून्य इगो ठेऊन मदतीला धावणारा अधिकारी म्हणून अनेकांनी त्यांना लक्षात ठेवले आहे. त्यामुळेच त्यांच्या काळात अभ्यागतांच्या रांगा दिसायच्या. केवळ गर्दीसाठी नव्हे तर भेटीतून शंभर टक्के तोडगा काढण्याची त्यांची क्षमता त्यांच्याकडे होती. गर्दीला रिझल्ट हवा असतो.प्रत्येकाला शांततेने ऐकण्याचे औदर्य त्यांच्याकडे होते. मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या सुवर्ण महोत्सवी आयोजनात त्यांनी घेतलेला पुढाकार स्मरणीय आहे. जलसंधारणाच्या कामात त्यांनी घेतलेला पुढाकार लक्षणीय आहे. मन्याड नदीच्या खोलीकरणात दाखविलेली रुची सुखद आठवण आहे. १६४ ठिकाणी गाळ काढण्याचे काम झाले आहे. यासोबतच माझी शाळा हा एक सामाजिक उपक्रम नांदेडकरांच्या कायम स्मरणात राहणार आहे. प्रशासनात निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी एक-एक शाळा दायित्व म्हणून सांभाळायला घेतली. आवश्यक सुधारणांसाठी पाठपुरावा केला आणि त्यातून एक मोठी सामाजिक चळवळ जिल्ह्यामध्ये उभी राहिली. अंतर्गत रस्ते व प्रमुख रस्त्यांच्या दुरूस्ती व देखभालीबाबत ते अतिशय आग्रही होते त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची त्यांनी विशेष काळजी घेतली.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या लेंडी प्रकल्पासाठी या तरुण अधिकाऱ्याने पाठपुराव्याचे जाळे विणले. मंत्रालयापासून ते स्थानिक स्तरापर्यंत त्यांचा पाठपुरावा कायम होता. या प्रकल्पाचे पूनवर्सन अंतिम टप्प्यात आहे. समृद्धी महामार्गाचे भूसंपादन जवळपास ९८ टक्के झाले आहे तर नांदेड-वर्धा रेल्वे मार्गाचे भूसंपादन ९५ टक्क्यांवर झाले आहे. रस्ते, रेल्वेमार्ग विकासाच्या वाटा असतात. त्या कायम पूर्णत्वाकडे नेणे उत्तम प्रशासनाचे लक्ष असल्याचे ते मानतात. आरोग्याबाबत अतिशय जागरूक असणारे जिल्हाधिकारी आपली आरोग्य यंत्रणा अधिक प्रतिसाद देणारी असावी याबाबत आग्रही होते. त्यांनी एका नव्या विषयाला जिल्ह्यामध्ये हात घातला. बदलत्या जीवनशैलीमुळे मुले न होणे, संतती प्राप्तीमध्ये अडचण येणे नवी सामाजिक समस्या आहे. यावर समुपदेशन व उपचाराने लगेच मार्ग काढता येतो. त्यामुळे वंधत्व निवारण क्लिनिक त्यांनी आरोग्य यंत्रणेत निर्माण केले. यामुळे विनाकारण होणारे महिलांचे शोषण, कुटुंबातील कलह यामध्ये एक नवा अधुनिक दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण करण्यास मदत झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील क्रिडाचे केंद्र करण्यासाठी त्यांची धडपड उल्लेखनीय होती. एका वर्षामध्ये जवळपास १४ राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन नांदेडमध्ये झाले आहे. २५ क्रीडा स्पर्धा झाल्या आहेत. प्रत्येक खेळाचे मैदान आहे. त्यामुळे या ठिकाणावरून सर्व प्रकारच्या खेळामध्ये खेळणारे खेळाडू निर्माण व्हावे यासाठी त्यांचे कायम प्रयत्न राहिले आहे. गुरुवारी येणाऱ्या प्रत्येकाकडे एक आठवण होती. हस्ते पर हस्ते झालेल्या मदतीची नोंद होती. कुणाकडे शाळा कुणाकडे दवाखाना अद्यावत झाल्याची आठवण होती. अडलेल्या खाजगी कामांनाही मोकळ्या केल्याची आठवण होती तर काही विद्यार्थ्यांनी तातडीने मिळालेल्या प्रमाणपत्राची आठवण काढून दिली. कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत घालवलेल्या काही क्षणांची आठवणही सांगितली ज्यांना काही बोलता आले नाही कधीच, त्यांनीही आज आभार व्यक्त केले.
(लेख विभागीय माहिती कार्यालय, लातूरकडून साभार)