चाळीसगाव शहरातील नागद रोड येथील घटना, आ. चव्हाण घटनास्थळी
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील नागद रोडवरील कृषी बाजार समितीच्या गेटसमोर असलेल्या झोपडपट्टीमध्ये आज शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शॉर्ट सर्किटमुळे तीन घरांना आग लागली. आगीच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, चाळीसगाव अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. आ. मंगेश चव्हाण यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ पंचनामे करून चौकशी करावी, असे प्रशासनाला आदेश दिलेत. पुढील १५ दिवस अन्नधान्य व संसार उपयोगी वस्तू आ. चव्हाण स्वतः नुकसानग्रस्त कुटुंबियांना देणार अशी माहिती त्यांनी दिली.
अग्निशमन अधिकारी अक्षय घुगे यांच्या नेतृत्वाखाली फायर टीम घटनास्थळी पोहोचली. टीमने तातडीने आग विझवण्याचे काम सुरू केले. आगीच्या भीषणतेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग विझवत असताना, अग्निशमन दलाच्या जवानांना तीन एलपीजी सिलेंडरचे रेग्युलेटर आणि ट्यूबला आग लागल्याचे दिसून आले. क्षणाचाही विलंब न करता, अग्निशमन अधिकारी घुगे आणि त्यांच्या टीमने सर्वात आधी सिलेंडरची आग विझवली आणि त्यांना घराबाहेर काढले. अग्निशमन दलाच्या कृतीमुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु तीन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी अग्निशमन अधिकारी अक्षय घुगे, फायर वाहन चालक ईश्वर पाटील, रमेश राठोड, बापू ठाकूर, फायरमन चंद्रकांत राजपूत, संदेश पाटील, राहुल राठोड, नितीन खैरे, विशाल मोरे, सागर देशमुख, शशिकांत चौधरी, फायर कंट्रोल रूमचे रितेश देशमुख, कपिल पगारे यांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. या आगग्रस्तांना माझ्यावतीने पुढील १५ दिवसांचे अन्नधान्य, शिधा देण्यात येईल तसेच सदर घटनेचा पंचनामा करून चौकशी करण्यात यावी व नुकसानग्रस्त कुटूंबांना शासकीय मदत मिळवून देण्याचा सूचना यावेळी प्रशासनाला केल्या, अशी माहिती आ. मंगेश चव्हाण यांनी दिली.