अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूमध्ये ‘माझे शहर माझी जबाबदारी’ स्वच्छता अभियान
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शहर या संकल्पनेस मूर्त स्वरुप देण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे. आपण जिथे राहतो, काम करतो तो परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपलीच असते. मी कचरा करणार नाही आणि इतरांनाही कचरा करून देणार नाही या विषयी जागरुकता ठेवण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा असे आवाहन जळगाव महानगर पालिकेचे अधिकारी प्रकाश पाटील यांनी केले. गांधी रिसर्च फाउंडेशन, एस.डी. फाउंडेशन आणि पर्यावरणदूत यांच्या संयुक्तविद्यमाने अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल येथे ‘माझे शहर माझी जबाबदारी’ या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी सुसंवाद साधला. यावेळी व्यासपीठावर प्राचार्या रश्मी लाहोटी, या अभियानाची ज्यांची संकल्पना आहे ते पर्यावरणदूत सुहास दुसाने, ज्येष्ठ नागरिक सुधाकर दुसाने, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी सुधीर पाटील, जैन इरिगेशनचे सहकारी किशोर कुळकर्णी उपस्थित होते.
भारतात स्वच्छ शहर म्हणून मध्यप्रदेशातील इंदौर या शहराची ओळख निर्माण झाली आहे. इंदौरप्रमाणे आपल्या जळगाव शहराला देखील सुंदर आणि हरित शहर करण्याची आपली स्वतःची जबाबदारी आहे असे प्रकाश पाटील यांनी उपस्थितांना आवाहन केले.
आरंभी शाळेच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सकाळ सत्राची शाळा असल्याने सकाळी साडेनऊ वाजता पर्यावरण जागृती प्रभात फेरी काढण्यात आली. यात स्कूलच्या शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थीनींचा सहभाग होता. यावेळी सहाव्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छते विषयी जनजागृती करणारी नाटिका सादर केली. पाचव्या इयत्तेचा विद्यार्थी अर्पित कासार याने स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे मनोगत व्यक्त केले. शिक्षिका पुनम पाटील यांनी स्वच्छतेबाबत स्वरचित कविता सादर केली.
सुहास दुसाने यांनी ‘माझे शहर माझी जबाबदारी’ बाबत उपस्थितांना माहिती सांगितली. शहर हे घर आहे ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझी आहे, मी उघड्यावर कचरा टाकणार नाही, कचरा जाळणार नाही,या अभियानात मी स्वतः आणि परिसरातील नागरिकांचा समावेश करून घेईल, तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणार नाही. वृक्षारोपण करण्याची जबाबदारी स्वीकारेन याबाबत सविस्तर सांगितले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी सुधीर पाटील, पर्यावरणदूत मदन लाठी आणि जैन इरिगेशनचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी साळुंखे आणि पर्यावरणदूत डिस्ट्रीक आयकॉन तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी मदन लाठी यांनी केले.