जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील औद्योगिक वसाहत परिसरातील महालक्ष्मी युनी एक्झीम प्रा. लि. या दालमिलमध्ये मध्यरात्री चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी कार्यालयातून ६० हजार रुपये रोख रक्कम, चांदीचे पूजा साहित्य आणि इतर वस्तू असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यानगरातील रहिवासी गिरीराज ओमप्रकाश जाजू (वय ५१) यांची औद्योगिक वसाहतीमधील एन-९८ सेक्टरमध्ये दालमिल आहे. दि. ३१ जानेवारी रोजी रात्री ते दालमिल बंद करून घरी गेले होते. दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी कार्यालयात परतल्यानंतर त्यांनी दरवाजे उघडे असल्याचे पाहिले. परिसरातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. नंतर कार्यालयातील टेबल ड्रॉवरची पाहणी केली असता, त्यामधील रोख ६० हजार रुपये, १ किलो वजनाचे ३५ चांदीचे नाणे आणि चांदीचे पूजा साहित्य चोरीला गेल्याचे आढळून आले. या प्रकरणी ३ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करीत आहेत.