पाचोरा शहरातील सकाळची घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : सकाळी व्यायाम म्हणून फिरण्यासाठी व धावण्यासाठी गेले असताना एका ४५ वर्षीय इसमाचा कोसळून डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पाचोरा शहरात एमएम महाविद्यालयाच्या मैदानात सोमवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वैभव शिवाजी पाटील (वय ४५, रा. खाजोळा ह.मु. गाडगेबाबा नगर, पाचोरा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, १ मुलगी, २ बहिणी असा परिवार आहे. (केसीएन) वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करून ते उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी दि. ३ रोजी वैभव साळुंखे हे एमएम महाविद्यालय येथे व्यायामासाठी गेले होते. तेथे धावत असताना अचानक ते खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने, नाकातुन व कानातून रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला.
आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. सदर घटनेमुळे अनेक कुटुंबासह मित्र परिवाराला धक्का बसला असून घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.