दोघेही पुण्यातील रहिवासी, गस्तीदरम्यान कारवाई
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहर पोलिसांनी गस्तीदरम्यान पुण्यातील दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. या संशयित आरोपींच्या ताब्यातून स्टीलच्या तलवारी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई ३१ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास करण्यात आली. संशयित दोघे सख्खे भाऊ पुण्यातील रहिवासी आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षल सुनील परदेशी (वय २५) व जयेश सुनील परदेशी (वय २२, दोघे रा. पांडुरंग हाईट्स, मांजरी फार्म, हडपसर, पुणे) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी रात्रीची पेट्रोलिंग करत असताना पाटणादेवी रोडवरील बायपासजवळ असणाऱ्या दशा माँ रसवंतीजवळ मोटारसायकलवर दोघे बसलेल्या तरुणांवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची विचारपूस केली. नंतर त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यात ८० से.मी. लांबीची स्टीलची एक तलवार व ६० सें.मी. लांबीच्या स्टीलच्या दोन तलवारी अशा एकूण ३ तलवारी व मोटारसायकल पोलिसांनी जप्त करून दोघांविरुद्ध पोलीस नाईक नितीन आगोणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील दोघे तरुण चाळीसगाव शहरात येऊन तलवारी घेऊन कुठे जात होते? यात त्यांचे आणखी साथीदार आहेत का ? याचा तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.