जळगाव शहरात तरुणासोबत घटना
जळगाव (प्रतिनिधी) : स्टॉक मार्केटशी संबंधित ॲप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगून एका तरूणाच्या बँक खात्यातून वेळोवेळी तब्बल ७ लाख ३० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत शनिवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कासमवाडी परिसरात मोहम्मद इमरान हानिफ तेली (वय ३८) हा तरूण मार्केटींगचे काम करून उदरनिर्वाह करतो. दि. २ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान त्यांच्या मोबाईलवर एस.एम.आर्या आनंद असे नाव सांगणाऱ्या अनोळखी महिलेने मोहम्मद तेली यांच्याशी व्हॉटसॲप आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना स्टॉक मार्केटशी संबंधित असलेले ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यातून एकुण ७ लाख ३० हजार रूपये परस्पर काढून घेतले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १ फेब्रुवारी रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात एस.एम.आर्या आनंद असे नाव सांगणाऱ्या अनोळखी महिलेविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे हे करीत आहे.