मुंबई ( वृत्तसंस्था ) – पोटच्या ९ वर्षीय मुलीवर वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना डोंबिवली पश्चिमेत उघडकीस आली हा नराधम स्वतःच्या आठ महिन्याच्या मुलीला जबदरस्तीने दारू पाजायचा. याचा विरोध करणाऱ्या मुलीच्या आईला देखील आरोपी बेदम मारहाण करायचा.
पीडित मुलीच्या आईने विष्णूनगर पोलीस ठाण्यात आता तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. तर आज आरोपीला कोर्टात हजर केले जाईल, असं पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांनी सांगितलं.
डोंबिवलीमध्ये पीडित ९ वर्षीय मुलगी आई वडिलांसोबत राहते. आई कामानिमित्त गावाला गेल्याची संधी साधून आरोपी बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिला शिवीगाळ, मारहाण करत धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला.
यानंतरही आरोपी मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन बायकोशी भांडायचा आणि आठ महिन्याच्या मुलीला दारू पाजत असे. याला विरोध केला म्हणून त्याने पत्नीला देखील बेदम मारहाण केली. पीडितेने विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी विकृत बापाला बेड्या ठोकल्यात.