मुंबई (वृत्तसंस्था) – भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. शिरीष बोराळकर, संग्राम देशमुख, संदीप जोशी आणि नितीन धांडे यांना भाजपने तिकीट दिले आहे. भाजपच्या राष्ट्रीय महासचिव तथा मुख्यालय प्रभारी अरुणसिंग यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये सोमवारी नावे जाहीर केली.

पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर, नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी, अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना तिकिट देण्यात आले आहे. महाविकास आघाडीतर्फे कोणत्या उमेदवारांचा सामना भाजपला करावा लागणार, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असल्याने समर्थकाला तिकीट देऊन त्यांची नाराजी काहीशी दूर करण्याचे पक्षातून प्रयत्न होताना दिसत आहेत.
नागपुरात गडकरी समर्थक अनिल सोले यांचे तिकीट कापून महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे फडणीस यांचे पारडे जड होणार आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.







