जळगाव तहसीलदारांच्या पथकाची धडक कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – जुना महामार्ग रोडवर निमखेडी शिवारात जळगाव प्रभारी तहसीलदारांच्या पथकाने धाड टाकून अवैध वाळूचा साठा पकडला. त्याचा पंचनामा करून प्रांत कार्यालयात अहवाल पाठवण्यात आला आहे. वाळूचा हा साठा लाखोंच्या घरात असल्याची माहिती मिळत आहे.

प्रभारी तहसीलदार नामदेव पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार निमखेडी शिवारात रेती साठा करून अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याचे कळाल्यानुसार याठिकाणी पथक पाठवले. त्यानुसार पथकातील नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर, मंडळ अधिकारी योगेश ननवरे, तरसोदचे तलाठी अनिरुद्ध खेतमाळस यांच्या पथकाने दुपारी ३ वाजेच्या सुमारास रविवारी ८ नोव्हेंबर रोजी निमखेडी शिवारात पाणी पाऊच फॅक्टरी मागे तपासणी केली. तेथे सुमारे ४५० ते ५०० ब्रास वाळू तर निमखेडी दर्गा परिसरात सुमारे २०० ते २२५ ब्रास वाळू साठा आढळून आला. सदर वाळू साठयाचे पथकाने पंचनामा करून प्रांत कार्यालयात माहिती देण्यात आली आहे. सदर वाळू साठा हा लाखोंच्या घरात असल्याची माहिती मिळत आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.







