मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः उद्रेक केला असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार वर टीका केली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र राज्य सरकारचे कौतुक केले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.
‘कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळं राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं!’, असा सल्ला रोहित पवारांनी विरोधकांना दिला.
तसेच कोविड रूग्णांच्या मृतांची आकडेवारी राज्य सरकार कडून लपवण्यात येत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता त्यावर देखील रोहित पवारांनी उत्तर दिले आहे. ‘कोविडच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत बोलायचं तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे. कोविडचा हा लढा संपलेला नाही, त्यामुळं राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुयात!’, असे ते म्हणाले.