मुंबई (वृत्तसंस्था) – देशाला उत्तम आघाडीची गरज आहे. जशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी काम करत आहे, तशी आघाडी देशपातळीवर असावी. असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच या विषयावर कालच शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच याबाबत हालचाली सुरु होतील’, अशी माहितीही त्यांनी दिली.
जसं महाराष्ट्रात तिन्ही पक्षांनी उद्धव ठाकरेंना प्रमुख केलं व सरकार उत्तम चाललं आहे. देशातली ही एक आदर्श आघाडी आहे. तीन भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले व त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. ही एक आदर्श अशी व्यवस्था आपण निर्माण केली. राष्ट्रीय स्तरावर देखील अशाप्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. अशाप्रकारचंच मत मी व्यक्त केलं आहे.
आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही. काँग्रेस पक्षाला आसाममध्ये चांगलं यश मिळालं आहे. पण सत्तेवर येऊ शकले नाही. केरळ आणि तामिळनाडूत त्यांना थोडंफार यश आलंय. पण काँग्रेसने अजून मुसंडी मारणं जास्त गरजेचं आहे. असेही संजय राऊत म्हणाले.