मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विरोधातील लढाई बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरे सरकारच कौतुक केले आहे असं राज्य सरकार कडून सांगण्यात येत आहे. यावरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकार वर टीका केली आहे. महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता मोदी ठाकरे सरकारचे कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही असे उपाध्ये यांनी म्हंटल.
आता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं त्यासारखं पंतप्रधानानी यांचं कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातोय. मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट! आता प्रत्येक बाबतीत PR एजेंन्सी वापरू नका, हेच तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रात म्हटले आहे, मग इतके झोंबले का? असा सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.
स्वःताच उदोउदो करत फिरायच, आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आल की केंद्रावर ढकलायच ही या राज्य सरकारची त्रिसूत्री आहे, सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचे अशा शब्दात उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला .
त्याचसोबत वास्तव माहिती लपवून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक करून घेतल्याच दावा करताना ‘मनाचा आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा. कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती? असा चिमटाही भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना काढला आहे.