मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधे, लसी, रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जणवत आहे. मात्र, या परिस्थितीत राज्य सरकार आणि BMC दिवस-रात्र लोकांना मदत करत आहे. याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील याची दखल घेऊन कौतुक केले. याशिवाय पंतप्रधानांनी देखील कौतुक केले. यानंतर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कौतुक करुन इतरांनी देखील महाराष्ट्राकडून शिकायला पाहिजे असा प्रत्यक्ष टोला त्यांनी केंद्राला लगावला आहे.
जावेद अख्तर यांनी ट्विट करुन केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. जावेद अख्तर यांचे ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं आहे. तरी देखील सरकार आणि BMC नं जबरदस्त क्षमतेनं काम करत आहे. इतरांनीही त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवं, अशा मजकूराचे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे. जावेद अख्तर यांनी यापूर्वी अनेकवेळा केंद्र सरकारच्या धोरणावर थेट टीका केली आहे. कोरोना काळात देखील ते केंद्र सरकारवर निशाणा साधत असतात. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विटच्या माध्यमातून हे भाष्य केल्याचे बोलले जात आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात अल्पावधीत तब्बल 2 हजार 208 बेड उभारण्यात आले आहेत. यामध्ये 868 ऑक्सिजन आणि 120 आयसीयू बेड यांचा समावेश आहे. तसेच 67 रुग्णांना व्हेंटिलेटर सपोर्ट देखील आहे. याशिवाय ज्या रुग्णांना नियमितपणे डायलिसिसची गरज आहे, अशा रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी 12 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी 7 X 24 तास रुग्णांना सेवा पुरवली जात आहे. यासाठी 378 डॉक्टर्स, 399 परिचारिका व 513 वैद्यकीय कर्मचारी (वॉर्डबॉय) कार्यरत आहेत. तसेच रुग्णालयाच्या इतर व्यवस्थेसाठी 200 कर्मचारी कार्यरत आहेत. तर 152 सुरक्षारक्षक सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहे. रुग्णालयासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका आहेत.