मुंबई (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. देशात लसीकरण चालू असून देखील कोरोना रूग्णांचा आकडा काही केल्या आटोक्यात येईना. कालच्या दिवसात 4 लाख 3 हजार 738 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 92 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत आहे. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 3 हजार 738 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 92 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 86 हजार 444 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 वर गेला आहे. त्यातील 1 कोटी 83 लाख 17 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत तर आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावले आहेत.