मुंबई (वृत्तसंस्था) – आज संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय मातृदिन साजरा केला जात आहे. तर आजच्या खास दिवशी कलाकार मंडळी कशी मागे राहतील. आजच्या मातृदिनाचे औचित्य साधून बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान हिने चाहत्यांना अनोखे सरप्राईज गिफ्ट दिले आहे. करिनाने इतके दिवस तिच्या नवजात बालकाचा एकही फोटो चाहत्यांसह शेअर केला नव्हता. मात्र अखेर आजच्या मातृदिनानिमित्त तिने छोट्या नवाबचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तैमूरसोबत छोटे नवाब असा संगम या फोटोत दिसतोय. हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.
अभिनेत्री करिना कपूर-खान हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. तर या फोटोसोबत कॅप्शन देत तिने लिहिले आहे कि, ‘आज आशेवर जग कायम आहे. आणि हे दोघे माझी आशा जागवतात. चांगल्या भविष्यासाठी. मातृदिनाच्या सर्व सुंदर आणि कणखर मातांना शुभेच्छा’! या फोटोमध्ये करिना आणि सैफचा मोठा मुलगा आणि चाहत्यांचा लाडका तैमूर दिसतो आहे. तर तैमूरच्या लहानश्या हातामध्ये छोटा राजकुमार देखील दिसत आहे. या फोटोसाठी आतापर्यंत ३ लाख ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावरून तिचे चाहते या पोस्टची किती आतुरतेने वाट पहात होते ह्याचा अंदाज आपण लावूच शकता.
अभिनेत्री करिना कपूर-खान आणि अभिनेता सैफ अली खान यांना याचवर्षी २१ फेब्रुवारीला दुसऱ्या मुलाचे आई-बाबा होण्याचे भाग्य लाभले. मुलाच्या जन्मानंतर सैफने सोशल मीडियावर पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. तसेच बाळ आणि बाळंतीण दोघांची प्रकृती उत्तम असल्याचेहि त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते. कपूर कुटुंब आणि खान कुटुंब छोट्या राजकुमाराच्या जन्मामुळे अतिशय आनंदी आहे. मात्र अद्याप त्याचा नामकरण विधी संपन्न झालेला नाही. असे म्हटले जात आहे कि, सैफ आणि करीन आपल्या या नवजात बालकाचे नाव काय ठेवायचे या बाबत गहाण विचार करीत आहेत. कारण, पहिल्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यानंतर करिना आणि सैफ यांच्यावर विविध प्रकारच्या टीका केल्या होत्या. त्यामुळे बराच काळ त्यांना सोशल मीडिया ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते.