जळगाव ( प्रतिनिधी ) – दोन्ही डोळ्यांची दृष्टी धूसर झालेल्या 77 वर्षीय आजीबाईंना कुठल्याही कामासाठी इतरांची मदत घ्यावी लागत होती. गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने राबविलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया महाअभियानात त्यांचे मोतीबिंदू काढण्यात आले. आणि आजीबाईंना हरपलेले दृष्टीवैभव परत मिळाले.
आधी काहीही दिसत नसलेल्या या आजीबाई आता चक्क स्वतः गोधडी शिवू लागल्या आहेत. त्यांना मिळालेली नवी दृष्टी हे त्यांच्या वृद्धत्वासाठी मोठे वरदान ठरले आहे. नांदेड येथील अहिल्याबाई कोळी यांची ही कहाणी सांगत होते त्यांचे नातू बाळू कोळी…
जिल्हा बँकेचे चेअरमन व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या संकल्पनेनुसार देवकर रूग्णालयात ना नफा ना तोटा तत्त्वावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया महाअभियान राबविले जात आहे. या अभियानात अहिल्याबाई कोळी यांच्या दोन्ही डोळ्यांवर महिन्याच्या अंतराने शत्रक्रिया करण्यात आली होती.
अहिल्याबाई यांचे नातू बाळू कोळी यांनी सांगितले, की आमच्या आजीला दोन्ही डोळ्यांनी काहीही दिसत नव्हते. त्यांना जागेवरून उठायचे असले, तरी कुटुंबीयांची मदत घ्यावी लागत होती. अशातच आम्हाला अभियानाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही देवकर रुग्णालय गाठले. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर मिळालेल्या नव्या दृष्टीमुळे त्या पूर्णपणे आत्मनिर्भर झाल्या. अगदी गोधडी शिवण्याचे काम देखील त्या करू लागल्या. ही कमाल पाहून एक महिन्यानंतर त्यांच्या दुसऱ्या डोळ्याचे ही ऑपरेशन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. देवकर रुग्णालयात अत्यल्प दरात त्यांच्या दुसर्या डोळ्याचेही ऑपरेशन झाले. आता तर आमच्या आजीला कोणाच्या आधाराची अजिबात गरज पडत नाही, हा अनुभव पाहून आमच्या आजीसह संपूर्ण कुटुंब भारावून गेले आहे. त्यामुळे आम्ही गरजू लोकांपर्यंत देवकर रुग्णालयाचे हे अभियान पोहोचविण्याची जबाबदारी स्वतः घेतली आणि संबंधित रुग्णांना अभियानाची माहिती देत आहोत. केवळ ऑपरेशनच नव्हे, तर दवाखान्यातील वातावरण, तेथे रुग्णाला मिळणाऱ्या सुविधा, डॉक्टरांची आपुलकी, आणि गुलाबराव देवकर यांच्याकडून रुग्णाची जातीने होत असलेली विचारपूस हे पाहून देखील आम्ही भारावून गेलो आहोत, याचा उल्लेखही बाळू कोळी यांनी केला.