अमळनेरात पोलिसांची धडक कारवाई
अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील शाह आलम नगर भागात पोलिसांनी छापा टाकून ९ हजार ८२० रुपयांचा २७ बंडल नायलॉन मांजा पकडला. पतंगाच्या नायलॉन दोऱ्याने आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले असून, जनावरे, पक्ष्यांसाठी हा मांजा धोकादायक ठरला आहे. शासनाने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
गुरुवारी १८ रोजी सायंकाळी शाह आलम नगरमध्ये नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यावरून हवालदार विनोद सोनवणे, सुनील तेली, मयूर पाटील, नम्रता जरे यांना कारवाईसाठी पाठविले. जिलानी किराणाच्या बाजूला अब्दुल रहीम अन्सारी नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आला. त्याच्याजवळून ६ हजार ३०० रुपयांचे ९ बंडल, ३ हजार रुपयांचे ५ बंडल, ५२० रुपयांचे बंडल, असे एकूण ९ हजार ८२० रुपयांचे २७ बंडल पकडले. अन्सारीविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम ५, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार प्रमोद पाटील तपास करीत आहेत.









