मॉस्को (वृत्तसंस्था) – करोनामुळे हैराण झालेल्या जगभरातील लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. सगळीकडे रूग्णांची संख्या तुफान वेगाने वाढत असताना आणि संशोधकांचे लस शोधण्याचे प्रयत्न अहोरात्र सुरू असताना रशियाने आता त्यांची लस बाजारात आणली आहे. स्फुटनिक 5 नावाने तयार करण्यात आलेली ही लस सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
रशियाच्या या लशीला गेल्याच महिन्यात मंजूरी देण्यात आली होती. त्या देशाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनीच त्याची घोषणा केली होती. एवढेच नव्हे, तर त्यांच्या कन्येलाही लशीचा डोस देण्यात आला होता. मात्र अन्य देशांनी आणि त्या देशांच्या संशोधकांनी या लशीबाबत शंकाही उपस्थित केली होती. आता हीच लस सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी त्या देशाने पाउले उचलली आहेत.
आता लवकरच क्षेत्रनिहाय या लशीचे वितरण केले जाणार असल्याचे रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. रशियाच्या गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपीडेमीलॉजी ऍन्ड मायक्रोबायोलॉजी, रूसी डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांनी ही लस विकसित केली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या स्फुटनिकने पूर्ण केल्या असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. येत्या काही महिन्यात रशियाची राजधानी मॉस्को येतील बहुतांश जणांना लस दिली जाणार असून लवकरच अन्य भागांत तिचे वितरण करण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे मॉस्कोच्या महापौरांनी सांगितले.
भारतासाठीही चांगली बातमी
रशियाच्या या लशीच्या या महिन्यात भारतासह अन्य काही देशांत क्लिनिकल चाचणी घेतली जाणार आहे. भारत, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, फिलीपाइन्स, ब्राझील या देशांत चाचण्या सुरू केल्या जाणार आहेत. या चाचण्यांचे निष्कर्ष ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जारी करण्यात येतील असे आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीएव यांनी म्हटले आहे.