जळगाव (प्रतिनिधी) – आ. सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याने आठ महिन्यात गोरगरीब नागरिकांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना २९ लाखांपर्यंत अर्थसहाय्य मिळाले आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातर्फे देण्यात आली आहे.
गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्यात येते. यात गुडघे बदल, खूबा शस्त्रक्रिया, फुफुस शस्त्रक्रिया आदी प्रकार आहेत. गरजू व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या रुग्णांना वेळीच उपचार व्हावे यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्यात येते.
याकरिता शहराचे आ. सुरेश भोळे उर्फ राजूमामा यांच्यातर्फे पाठपुरावा होऊन रुग्णांना मागील १ जुलै पासून तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत २९ लाख ३० हजार रुपयांची मदत मिळाली आहे. याबाबत आ. भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे आभार मानले आहे. तसेच ज्या रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत हवी आहे, त्यांनी संपर्क करावा असे आवाहन आ. भोळे यांनी केले आहे.