रावेर तालुक्यातील निमड्या येथील घटना
रावेर (प्रतिनिधी):- शरीरसुखाच्या मागणीला नकार दिल्याच्या रागातून एका नराधम पतीने आपल्या आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील निमशेत (सायबूपाडा) येथे घडली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

लालू शरद पावरा (वय २५, रा. निमड्या, ता. रावेर) असे मयत महिलेचे नाव आहे. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ३ ते ५ वाजेच्या सुमारास आरोपी पती शरद मिरलाल पावरा याने राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जंगलात पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र, लालू पावरा ही आठ महिन्यांची गर्भवती असल्याने तिने त्रासामुळे पतीला नकार दिला. या नकाराचा राग आल्याने शरद पावरा याने तिला जमिनीवर पाडून तिचे हात-पाय दाबले आणि छातीवर बसून दोन्ही हातांनी गळा आवळून तिची हत्या केली.
एवढेच नव्हे तर, तिने अंगात घातलेल्या शर्टच्या साहाय्याने तिचा गळा आवळून तो शर्ट झाडाला बांधून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलीस पाटील रमजान अहमद तडवी (वय ३७, रा. अंधारमळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (फैजपूर विभाग) अनिल बडगुजर, रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच आज, १३ एप्रिल रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी (चोपडा विभाग, अतिरिक्त प्रभार फैजपूर) अण्णासाहेब घोलप यांनीही भेट दिली आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रावेर पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत आरोपी पती शरद मिरलाल पावरा याला १३ एप्रिल रोजी मध्यरात्री ००:०१ वाजता अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहेत. जंगलात घडलेल्या या क्रूर घटनेमुळे संपूर्ण रावेर तालुक्यात खळबळ उडाली असून, गर्भवती पत्नीची हत्या करणाऱ्या पतीवर संताप व्यक्त केला जात आहे.









