जळगाव ( प्रतिनिधी ) – भादली येथील मस्जिद रोड आणि राडे वाडा या परिसरातील सात घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून लाखो रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
भादली येथे मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. सात बंद घरे फोडल्याने गावात खळबळ उडाली आहे. यात दोन दुकानांचा समावेश आहे. मस्जिद रोडवरील राहणारे राजेंद्र रमेश चौधरी, दिपक जनार्दन चौधरी आणि तुळशीदास श्रावण चौधरी, रडे वाडा येथील राहिवाशी रामचंद्र बाबुराव रडे, चिंधू वामन रडे यांची बंद घरे फोडून दागिन्यांसह रोकडचा मुद्देमाल लांबविला आहे. काशीनाथ सखाराम रडे यांचे किरणा दुकान आणि योगेश हेमचंद्र झांबरे यांचे श्रीराम ॲग्रो ट्रेंडर्स हे दोन दुकानेही फोडून मुद्देमाल चोरून नेला आहे.
बंद घराचे कुलूप तोडण्यासाठी कटरचा वापर करण्यात आला आहे. कुलूप तोडून घराच्या दरवाजाच्या बाहेर ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. गावातील वस्ती दाटीवाटीची असतांना चोरी करतांना शेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांना देखील समजले नाही.
पहाटे रडे गल्लीत राहणाऱ्या एका महिलेला तीन दुचाकींवर सहा चोरटे जातांना दिसून आले होते. त्यावेळी गावात चोरी झाल्याचे लक्षात आले आहे. नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी फिंगर प्रींट एक्सपर्ट टीम आणि डॉग स्कॉड पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. त्याचप्रमाणे सीसीटीव्हीचा आधारे शोध घेण्याचे काम सुरू आहे.