धार्मिक स्थळावर तरुण फकिराचा खून
चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात प्राणघातक हल्ल्यांचे सत्र सुरूच असून आता चाळीसगाव तालुक्यात दोन ठिकाणी एकाच दिवशी दोन जणांचे खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील गैबनशहा बाबा दर्गावर दि. ८ रोजी दुपारी एका फकीर तरुणाचा धारदार हत्याराने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
तरबेज शहा याकूब शहा (वय २५,रा.जामडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गैबनशहा बाबा दर्गावर काम करतो. गुरुवारी ८ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास
हा फकिर तरुण धार्मीक विधीचा एक भाग म्हणून फातिमा वाचत असतांना पाठीमागून एक युवक धावत आला व त्याने तिक्ष्ण हत्याराने पाठीवर वार करून पळ काढला. या प्रकाराने तेथे उपस्थित भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. जखमी फकिरास उपचारार्थ रूग्णालयात आणत असतांनाच रस्त्यावरच त्याचा मृत्यू झाला.
तरुणाच्या खुनाचे कारण कळून आले नाही. पोलीस पाटलाने माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली. चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. तालुक्यातील जामडी येथील गैबनशहा बाबा दर्गावर आज नवसाचा कार्यक्रम असल्याने भाविकांची गर्दी झाली होती. त्यावेळी हा प्रकार घडून आला आहे. पोलीस मारेकऱ्यांनी माहिती काढत असून घटनास्थळी पोहोचले आहेत.