विधानसभेसाठी त्रिपाठी, स्मिता वाघ, अत्तरदे, कांडेलकरांकडे धुरा
भाजपकडून लोकसभा, विधानसभा निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर
जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षातर्फे वर्षभरावर आलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभेसाठी व विधानसभेसाठी निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर केली असून तयारीला लागण्यासाठी संकेत दिले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा व ११ विधानसभेच्या मोर्चेबांधणी करण्यासाठी पक्षाने जबाबदारी देताना जुन्या-नव्या तसेच तरुणांनाही संधी देण्याचे काम केले आहे.
जळगाव लोकसभेसाठी डॉ. राधेश्याम चौधरी तर रावेर लोकसभेसाठी जिल्हा परिषदेतील नंदकिशोर महाजन यांचेकडे जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचा किंवा मित्रपक्षांच्या उमेदवार निवडून आणण्याची महत्वाची जबाबदारी आता हे दोघे कसे पार पाडतात याकडे पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. पक्षसंघटन हा मोठा मुद्दा राहील.
विधानसभेसाठी देखील नेमणूक झालेल्या निवडणूक प्रमुखांना त्यांची कसोटी पणाला लावून पक्षाने दिलेल्या किंवा पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. अचूक नियोजन, योग्य पक्षसंघटन, कार्यकर्त्यांमधील संवादीपणा त्यांना साधावा लागणार आहे.
विधासभा निवडणूक प्रमुखांत जळगाव शहरासाठी नगरसेवक विशाल त्रिपाठी, जळगाव ग्रामीणसाठी चंद्रशेखर अत्तरदे, अमळनेरकरीता स्मिता वाघ, मुक्ताईनगर-बोदवडसाठी अशोक कांडेलकर, जामनेर – चंद्रकांत बाविस्कर, पाचोरा – अमोल शिंदे, चाळीसगाव – भुवनेश्वर पाटील, एरंडोल-पारोळाकरीता करण पवार, भुसावळ- संजय पाटील, रावेर-यावल मतदारसंघासाठी अमोल हरिभाऊ जावळे आणि चोपडाकरीता गोविंद सैंदाणे यांची निवड झाली आहे.
झालेल्या निवडी पाहता, शिवसेना शिंदे गटाशी देखील जुळवून घेण्याचे महत्वाचे काम या निवडणूक प्रमुखांना करावे लागणार आहे. यानंतर जागावाटपाचा तिढाही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नवनियुक्त निवडणूक प्रमुखांना मोठे आव्हान असणार आहे.