जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणचा १८ वा वर्धापन दिन मंगळवारी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महावितरण अभियंते तसेच कर्मचाऱ्यांनी संगीत रजनी कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
शहरातील भैयासाहेब गंधे सभागृहात झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते झाले. यावेळी अधीक्षक अभियंता अनिल महाजन, सहायक महाव्यस्थापक नेमीलाल राठोड, कार्यकारी अभियंता राजेंद्र मार्के, अनिरुद्ध नाईकवाडे, रमेशकुमार पवार, संदीप शेंडगे, प्रदीप घोरुडे, ब्रजेशकुमार गुप्ता, धमेंद्र मानकर, विजय पाटील, रामचंद्र चव्हाण, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, प्रणाली विश्लेषक विलास फुलझेले, वरिष्ठ व्यवस्थापक देवेंद्र कासार, अमित सोनवणे, व्यवस्थापक तन्वी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य अभियंता हुमणे यांनी महावितरणच्या वाटचालीची माहिती देऊन यावर्षी केलेल्या १०२ टक्के थकबाकी वसुलीबाबत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. अधीक्षक अभियंता महाजन यांनीही कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शेलकर यांनी महावितरणने ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती दिली.
या सोहळ्यात कर्मचाऱ्यांनी विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. उज्ज्वल पाटील, विशाल आंधळे, पराग चौधरी, सुरेश पाचंगे, संतोष सोनवणे, अमेय भट, स्वरांगी श्रावगी, सुरेश गुरचढ, युगंधरा राऊत, ज्योती दुसाने, तनिष्का भालेराव यांनी सुमधुर गाणी गायली. संदीप मराठे यांनी काव्य वाचन केले. मोहिनी पाटील यांनी रांगोळी काढली तसेच नृत्यही केले. गायत्री पाटील, ग्रीष्मा रामकुवर, तनिष्का नाचन यांनी नृत्य सादर केले. कुर्बान तडवी यांनी काठी फिरवण्याचे कौशल्य दाखवले. रविंद्र खलसे यांनी बासरीवादन करुन उपस्थितांची मने जिंकली. सर्व कर्मचारी कलावंतांनी कला सादर करून वर्धापनदिनाचा आनंद द्विगुणित केला. सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता रत्ना पाटील यांनी केले.