भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, यावल, पारोळा नगरपालिकांचाही समावेश
मुंबई ( प्रतिनिधी ) – आज राज्य निवडणूक आयोगाने 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 18 ऑगस्टरोजी मतदान तर 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार असून निवडणुकीसाठीची आचारसंहिता जारी झाली आहे.ठिकठिकाणचे पालिका व पोलिस प्रशासन कामाला लागले आहेत.
20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करतील. 22 ते 28 जुलैपर्यंत संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरली जातील तर छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहिर होईल 4 ऑगस्टपर्यंत अर्ज माघारी घेता येतील. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. 18 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच दरम्यान मतदान घेतले जाणार आहे. 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल.
अर्ज माघारी घेणे व प्रत्यक्ष मतदान यात 14 दिवसांचा कालावधी असून प्रचारासाठी दोन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. यंदा प्रथमच संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबचा उल्लेख निवडणूक आयोगाने केलेला असल्याने ती एक नवीन बाब ठरणार आहे.