जळगाव ( प्रतिनिधी ) – क्रेडीट कार्ड ॲक्टीव्ह करून देण्याचा बहाणा करत ओटीपी विचारून व्यावसायिकाची दोन लाखाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मोहद खालीद अब्दुल करीम (वय-३५) रा. तलाठी ऑफीसच्या मागे जुने मेहरूण येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मेडीकल चालवून आपला उदरनिर्वाह करतात. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ते त्यांच्या मेडीकल दुकानावर बसलेले असतांना त्यांना अनोळखी नंबरवरून कॉल आली. आपण आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. क्रेडीट कार्ड ॲक्टीव्ह करून देतो व पीन जनरेट करून देतो असे सांगितले. त्यावर मोहद यांचा विश्वास बसला आणि त्यांनी मोबाईलवर आलेला ओटीपी सांगितले. त्यानंतर Housing.com या वेबसाईटवरून त्यांच्या क्रेडीटकार्डवरून परस्पर २ लाख १२ हजार १०० रूपयांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मोहद खालीद यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिपक जगदाळे करीत आहे.