जळगाव (प्रतिनिधी) – पिंप्राळा येथील आठवडे बाजारात वाहन चालकाचा रस्ता अडवून मारहाण करत त्याचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवल्याची घटनाघडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
दादावाडी परिसरात वृंदावन पार्क येथे राहणारे लखीचंद वामन बडगुजर शुक्रवारी दुपारी पिंप्राळा येथील आठवडे बाजार परिसरातून जात होते. यावेळी तीन ते चार जणांनी त्यांना अडवले. त्यानंतर चापटा बुक्क्यांनी मारहाण करून लखीचंद बडगुजर यांच्या खिशातील मोबाईल जबरीने हिसकावून घेत चोरटे पसार झाले.
याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चार संशयित निष्पन्न केले आहेत. ते सर्व झारखंड राज्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांच्यासह तुफान रघु रिखीयासन (वय २०) यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.