नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये द्रविड मुन्नेत्र कझगम अर्थात डीएमकेचे नेते एमके स्टॅलीन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मोठा विजय प्राप्त केल्यानंतर आज सकाळी राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी एमके स्टॅलीन यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पण विशेष म्हणजे स्टॅलीन यांच्या मंत्रिमंडळात के.एन. नेहरु आणि आर. गांधी यांचा समावेश आहे. स्वत: स्टॅलीन यांचे नाव हे रशियन क्रांतिकारक आणि समाजवादी नेते स्टॅलीन यांच्या नावावरुन ठेवण्यात आल्यामुळे तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात आता स्टॅलीन यांना गांधी आणि नेहरु रिपोर्ट करतील, असे चित्र आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे मंत्री म्हणून के.एन. नेहरु यांची निवड झाली आहे तर आर. गांधी यांची टेक्स्टाईल मंत्री म्हणून निवड झाली आहे. के.एन. नेहरु हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. 1989 पासून ते तिरूची वेस्ट या मतदारसंघातून सातत्याने विजयी होत आहेत. त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ठेवले होते. तर आर. गांधी हे राणीपेट या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. ते 1996 साली पहिल्यांदा विजयी झाले होते.
मुथुवेल करुणानिधी स्टॅलीन असे मुख्यमंत्री स्टॅलीन यांचे पूर्ण नाव आहे. त्यांचे हे नाव सोव्हिएत रशियाचे क्रांतिकारक आणि समाजवादी नेते स्टॅलीन यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर 2018 साली ते डीएमकेचे अध्यक्ष बनले.
डीएमकेने तामिळनाडूच्या विधानसभेमध्ये 133 जागा जिंकल्या आहेत, तर विरोधी असलेल्या एआयडीएमके पक्षाने 66 जागा जिंकल्या आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत डीएमकेला 32 जागांचा फायदा झाला असून डीएमकेच्या विजयात स्टॅलिन यांचा सिंहाचा वाटा आहे.